श्री शिवाजी महाविद्यालयात जी-२० युवा संवाद स्पर्धा
परभणी (२१) भारत हा युवा देश म्हणून जागतिक स्तरावर ओळखला जातो. विचारांचा समृद्ध वारसा लाभलेल्या देशाला विकसनशील ते विकसित असा टप्पा साध्य करण्यासाठी युवकांना अमृत काळातील पंचप्रणाची ओळख करून देत ऐतिहासिक विचारांचा वारसा जपत विकास साधला जाऊ शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते प्रा.सुभाष ढगे यांनी शुक्रवारी (दि.२१) रोजी केले. येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जी-२० युवा संवाद अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव तर उद्घाटक म्हणून रासेयोचे संचालक डॉ.मलिकार्जुन करजगी उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य इंजि. नारायण चौधरी, सिनेट सदस्य डॉ. राजगोपाल कालानी, सुभाष विखे, अशोक गुजराती, शीतल सोनटक्के, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, समन्वयक डॉ.तुकाराम फिसफिसे, प्रा.शरद कदम आदींची उपस्थिती होती. उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुभाष ढगे पुढे म्हणाले, जी-२० युवा संवाद आणि अमृत काळातील पंचप्रणच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात देशाच्या प्रगतीचे विचार पेरणे काळाची गरज आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने युवकांच्या माध्यमातून हे पंचप्रण आपण साध्य करू शकतो. त्यासाठी युवकांनी सगळे भेद विसरून विकासाचे सूत्र लक्षात घेऊन आपले कर्तव्य बजावले तर देश लवकरच विकसित देश म्हणून जागतिक स्तरावर नावलौकिक स्थापित करेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. उदघाटकीय भाषणात डॉ. मालिकार्जुन करजगी यांनी रासेयो स्वयंसेवकांचे कर्तव्य आणि अमृत काळातील पंचप्रण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.जाधव यांनी राष्ट्रउभारणी आणि देशाच्या विकासात रासेयोच्या युवकांनी महत्त्वाची भूमिका बजावणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. सदरील स्पर्धेत अमृत काळातील पंचप्रण या संदर्भाने विकसित भारत, भारतीय वारशाचा अभिमान, नागरिकांची कर्तव्ये,एकात्मतेचे सामर्थ्य, गुलामगिरीच्या मानसिकतेतून शतप्रतिशत मुक्तीचा संकल्प या विषयावर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदरील स्पर्धेचे परीक्षण डॉ.पंडित निर्मळ, डॉ.कल्याण गोपनर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तुकाराम फिसफिसे,सूत्रसंचालनप्रा. अनिल बडगुजर तर आभार प्रा.शरद कदम यांनी मानले. सदरील कार्यक्रमास जिल्ह्यतील विविध महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रमाधिकारी तसेच स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.