राष्ट्रध्वज प्रत्येक भारतीयांच्या स्वाभिमानाचे प्रतीक -प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांचे प्रतिपादन#श्री शिवाजी महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा

राष्ट्रध्वज प्रत्येक भारतीयांच्या स्वाभिमानाचे प्रतीक
-प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांचे प्रतिपादन

श्री शिवाजी महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा

परभणी (०२) १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करावा. राष्ट्रध्वज हे आपल्या देशाप्रती श्रद्धा, आस्था आणि स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात मंगळवार (दि.०२) रोजी विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्याच्या संदर्भाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, सहसंचालक कार्यालयाचे प्रशासन अधिकारी संभाजी सूर्यवंशी, शंकर बर्वे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, महोत्सव समन्वयक डॉ. जयंत बोबडे आदींची उपस्थिती होती.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ.बिसेन पुढे म्हणाले, विद्यापीठ परीक्षेत्रात जवळजवळ एक लाख पाषष्ठ हजार विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरावर राष्ट्रध्वज लावला जावा. सोबतच त्या विद्यार्थ्याने आपल्या आजूबाजूच्या घरावर देखील राष्ट्रध्वज लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्रत्येक महाविद्यालयाने किमान एक हजार विद्यार्थ्यांच्या घरावर राष्ट्रध्वज लावण्याची व्यवस्था करावी.त्यासाठी समाजात समाजसेवी वृत्ती असलेल्या दानशूरांकडून ध्वजासाठी लागणारी सामग्री घ्यावी. हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात वर्षभर आजादी का अमृत महोत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव मनोगतात म्हणाले, आजादी का अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने जानेवारी ते अद्यापपर्यंत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, देशप्रेम जागृती करण्याचे काम केले आहे. यावेळी डॉ.सूर्यप्रकाश जाधव, डॉ.मल्लिकार्जुन करजगी यांनीही मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जयंत बोबडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.दिगंबर रोडे यांनी केले.
सदरील कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, आजादी का अमृत महोत्सव समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सय्यद सादिक, सुरेश पेदापल्ली, साहेब येलेवाड आदींनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *